श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार संस्था गटात दिव्या फाऊंडेशन व व्यक्ती गटात श्री मनिष पावडे यांना प्रदान

समाजघटकांनीही समाजकार्यात आपला सहभाग द्यावा – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती – पुरस्कार दिल्यानंतर आपले कार्य संपले असे नाही, तर समाजघटकांनीही सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग द्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. 2025 या वर्षीचा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार संस्था गटात बुलडाणा जिल्ह्रातील वरवंड येथील दिव्या फाऊंडेशनला व व्यक्ती गटात अमरावती शहरातील श्री मनिष रमेशराव पावडे यांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते ससन्मान प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक काकडे व समाजसेवक श्री मनिष पावडे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रु. पाच हजार रोख देऊन सन्मान केला व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, दानदात्यांचे प्रतिनिधी व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे समन्वयक श्री दिलीप काळे, दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक काकडे, समाजसेवक श्री मनिष पावडे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त दोन्ही मान्यवरांच्या कार्याला शुभेच्छा देवून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, सुरुवातीला एकच पुरस्कार दिला जात होता. परंतु संस्था आणि व्यक्ती यांच्यात कार्यात फरक असतो, त्यामुळे व्यक्ती गटातही पुरस्कार दिल्या गेला पाहिजे, अशी भावना ठेवून त्यादृष्टीने पावले उचललीत आणि त्याचा मूर्त रुप मिळाले, याचा आनंद आहे. समाजमनाने देखील आता चिंतन करणे गरजेचे असून अशाप्रकारच्या संस्था का उभ्या कराव्या लागल्यात, केवळ पुरस्कार देवून आपली जबाबदारी संपली असे नाही, तर आपलाही त्यात सहभाग असावा अशी समाजघटकाने भावना ठेवली पाहिजे, असे सांगून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सदैव आपल्या पाठिशी राहील असा वि·ाास कुलगुरूंनी दोन्ही पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक काकडे व श्री मनिष पावडे यांना दिला.
दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक काकडे यांनी संस्था उभारणीचा मागोवा घेतांना एका मनोयात्री महिलेचा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर आपण एक भूखंड घेऊन तेथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्याचे सांगून दु:ख निवारण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जात असल्याचे ते म्हणाले. मनोयात्रीची सेवाच नाही, तर त्यांना स्वत:च्या पायावर उभे करेपर्यंत फाऊंडेशनचे कार्य आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक मनोयात्रीचे आधारकार्ड, मतदान कार्ड सुध्दा तयार करण्यात आलेत व अनेकांना ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांच्या घरी देखील पोहचवून दिल्याचे श्री काकडे यांनी यावेळी सांगितले. या पुरस्कारामुळे आपले कार्य सफल झाल्याचे सांगून आता आणखी जबाबदारी देखील वाढल्याचे ते म्हणाले. श्री मनिष पावडे यांच्यावतीने श्री महेंद्र देशमुख यांनी मनिष पावडे यांच्या कार्याची माहिती देतांना मनिष पावडे यांच्या आईवडीलांचा वारसा ते चालवित आहेत व लुळ्यापांगळ्यांना आपलंस करुन तीन अंध मुलींचे लग्न मनिष पावडे यांनी लावून दिल्याचे श्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.व्ही.एम. मेटकर म्हणाले, माजी आमदार बबनराव मेटकर व दादासाहेब गवई यांचा विद्यापीठाच्या विकासात मोठा हातभार लागला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या नामकरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठात अध्यासन केंद्र व्हावे यासाठी दादांनी पाठपुरावा केला आणि त्याचे सार्थकही झाल्याचे सांगून भैय्यासाहेब मेटकर पुढे म्हणाले, संत गाडगे बाबांचे कार्य समाजापर्यंत जावे, तरुणांना प्रेरणा मिळावी या हेतूने नावाने हा पुरस्कार सुरू सुरू केला. पुरस्कार सुरू करण्यामागील उद्देश आज सफल होत असल्याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंंगी स्व. नागोरावजी व स्व. बबनरावदादा मेटकर याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिव्या फाऊंडेशन व श्री मनिष पावडे यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, तर आभार जनसंपर्क विभागातील श्री ओम जगताप यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, अॅड. यदुराज मेटकर, डॉ. एम.टी. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद कासट, श्री अभिनंदन पेंढारी, श्री मुंधडा, शाम देशमुख, दिपक हुंडीकर, प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, संजय जैन, श्री पावडे, श्री काकडे व श्री मेटकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



