अर्धापूर–तामसा महामार्गावर भीषण अपघात

लोणी गावाजवळ आपे रिक्षा ३० फूट खोल खदानीत; बालकासह सहा जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर–तामसा राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. अर्धापूर तालुक्यातील लोणी गावाजवळ ओबडधोबड रस्त्यामुळे प्रवाशांनी भरलेली आपे रिक्षा तब्बल २५ ते ३० फूट खोल खदानीत कोसळली. या भीषण अपघातात एका बालकासह सहा जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेनापूर तांड्यावरून प्रवासी घेऊन अर्धापूरकडे येणारी आपे रिक्षा जुन्या नदीच्या पुलाशेजारील खराब आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. रस्ता अत्यंत ओबडधोबड असल्यामुळे रिक्षा थेट पुलाच्या कडेलाून खाली खदानीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रवाशांच्या आर्त किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस आणि आरोग्य पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथम अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विष्णुपुरी शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदारांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. “रस्ते की मृत्यूचे सापळे?” असा सवाल उपस्थित करत प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार, असा रोषही नागरिकांनी व्यक्त केला आहे.



