Mumbai University: महाविद्यालयांच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान? मुंबई विद्यापीठाचा कठोर कारवाईचा इशारा!

मुंबई: मुंबई विद्यापीठाने आपल्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना आणि स्वायत्त संस्थांना एक शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचा एबीसी आयडी (ABC ID) तयार करून तो सादर करणे बंधनकारक असतानाही, अनेक महाविद्यालयांनी यात दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन
विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, सर्व संलग्नित महाविद्यालये आणि संस्थांनी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर करणे अनिवार्य आहे. या मुदतीत कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
एबीसी आयडी तयार न केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते:
- क्रेडिट अपडेट होणार नाहीत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स एबीसी (Academic Bank of Credits) प्रणालीत जमा होणार नाहीत.
- निकाल राखले जाणार: ज्या विद्यार्थ्यांचा आयडी तयार नसेल, अशा विद्यार्थ्यांची गुणपत्रिका (Marksheet) आणि पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठाकडून राखून ठेवली जातील.
- नॅड (NAD) पोर्टलची समस्या: संबंधित विद्यार्थ्यांचे ‘क्रेडिट अवॉर्ड’ नॅशनल एकेडमिक डिपोझिटरी पोर्टलवर अपडेट केले जाणार नाहीत, ज्यामुळे विद्यार्थी अधिकृत पदवीपासून वंचित राहू शकतात.
विद्यापीठाचा संताप; ‘गंभीर प्रशासकीय त्रुटी’
मुंबई विद्यापीठाने यापूर्वी अनेकदा परिपत्रके काढून आणि बैठका घेऊनही काही महाविद्यालयांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. विद्यापीठाने याला ‘गंभीर प्रशासकीय त्रुटी’ म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेता, हा तपशील ‘ई-समर्थ’ प्रणालीशी तातडीने संलग्न करण्याचे निर्देश परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिले आहेत.
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शैक्षणिक प्रशासनातील शिस्त राखण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी या निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. दिरंगाई करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.” — मुंबई विद्यापीठ प्रशासन



