जुनोना ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा कळस! वस्तू खरेदी न करताच १० हजारांचे बोगस बिल

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जुनोना ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गावाच्या विकासासाठी असलेला निधी सरपंच आणि ग्रामसेवक (सचिव) यांनी संगनमताने बोगस बिल सादर करून हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नेमका घोटाळा काय?
माहिती अधिकारांतर्गत (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, जुनोना ग्रामपंचायतीने मांगली येथील ‘वैद्य ट्रेडर्स’ यांच्याकडून पाईप आणि सिंटेक्स टाकी खरेदी केल्याचे दाखवले आहे. यासाठी १० हजार रुपयांचे बिलही काढण्यात आले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्षात अशी कोणतीही वस्तू ग्रामपंचायतीला मिळालीच नाही.
स्वतः संबंधित दुकानदारानेही कबूल केले आहे की, “आमच्याकडून कोणतीही वस्तू नेण्यात आली नाही, केवळ बोगस बिल देण्यासाठी आम्हाला काही रक्कम देण्यात आली होती.” या कबुलीजवाबामुळे सरपंच आणि सचिवाची मिलीभगत उघड झाली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ग्रामस्थांचा रोष
या भ्रष्टाचाराबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती पवनी कडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार करूनही अद्याप कोणत्याही ठोस कारवाईचे पाऊल उचलले गेलेले नाही. यामुळे पंचायत समितीचे अधिकारी या प्रकरणावर पांघरूण घालत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा: “कोणतीही खरेदी न करता बोगस बिले काढून जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे. जर संबंधित सरपंच आणि सचिवावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली नाही, तर पवनी पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा जुनोना येथील त्रस्त ग्रामस्थांनी दिला आहे.



