महेंद्र कॉलनी छत्रसाल नगरमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक आजारी; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

अमरावती : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महेंद्र कॉलनी अंतर्गत येणाऱ्या छत्रसाल नगर परिसरात सध्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात पसरलेल्या कचऱ्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याची संतापजनक स्थिती निर्माण झाली आहे.
सर्व्हिस गल्ल्या बनल्या कचरा डेपो
परिसरातील कॉलनींमधील मुख्य रस्ते सोडले, तर सर्व्हिस गल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या गल्ल्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचलेला असून तो उचलण्यासाठी मनपाचे स्वच्छता कर्मचारी फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
स्वच्छतेअभावी परिसरात मलेरिया, डेंग्यू, ताप, सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांनी प्रत्येक घरात शिरकाव केला आहे. “आम्ही नियमित कर भरतो, तरीही आम्हाला अशा नरकयातना का भोगाव्या लागत आहेत?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
मनपाने त्वरित लक्ष देण्याची गरज
नियमित साफसफाई आणि धूरफवारणी (Fogging) करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महानगरपालिकेने या गंभीर परिस्थितीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही छत्रसाल नगरमधील नागरिकांनी ‘सिटी न्यूज’शी बोलताना दिला आहे.



