BhandaraLatest NewsSocial News

केक-बॅनरशिवाय वाढदिवस! साकोलीत सरपंच सविताताई उपरीकर यांचा समाजसेवेचा आदर्श

भंडारा

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आज एक वेगळाच वाढदिवस साजरा झाला. ना केक, ना फुगे, ना बॅनर… तरीही हा वाढदिवस सध्या संपूर्ण साकोली तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. विहीरगाव/बुराड्या येथील लोकनियुक्त सरपंच सविताताई उपरीकर यांनी राजकारणाला नवा अर्थ देत समाजसेवेचा ठसा उमटवणारा वाढदिवस साजरा केला.

सविताताई उपरीकर यांनी आपला ३१ वा वाढदिवस ७ जानेवारी रोजी समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

या निमित्ताने साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, विहीरगाव/बुराड्या येथे इयत्ता पहिली ते सातवीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, बालवाचन पुस्तके तसेच फळांचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.

या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकवर्गाकडून मनापासून कौतुक करण्यात आले. आजच्या राजकारणात वाढदिवस म्हणजे बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी अशी ओळख निर्माण होत असताना, सविताताई उपरीकर यांनी थेट समाजसेवेचा आदर्श उभा केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते चुनीलाल वासनिक, उपसरपंच प्रमोद इटवले, मुख्याध्यापक बी. एल. मेश्राम तसेच अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच महामानवांचे फोटो भेट देऊन सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यात आली.

शिक्षण, पर्यावरण आणि संस्कार… या तिन्ही आघाड्यांवर एकाच दिवशी काम करणारा हा उपक्रम साकोली तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button