AkolaCrime NewsLatest News

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन; अकोला हादरला

अकोला

अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या धारदार शस्त्र हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

दि. ६ जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात, गावातील मशिदीजवळ हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि छातीवर गंभीर घाव बसले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती.

प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी उबेद खान कालू खान उर्फ राजीक खान याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असून सदर आरोपीला पोलिसांनी पणज येथून ताब्यात घेतले आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की जुन्या वैयक्तिक वादातून, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हिदायत पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button