Amaravti GraminLatest NewsSports

पापळ येथे २५ वर्षांची कबड्डी परंपरा कायमडॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती / नांदगाव खंडेश्वर : भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली कबड्डी स्पर्धेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रभरातून आलेल्या नामवंत कबड्डी संघांच्या सहभागामुळे पापळ गाव सध्या क्रीडामय वातावरणाने भारावून गेले आहे.

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन यंदा दि. २७ डिसेंबर रोजी लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसळ तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतील कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला असून, खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

या कबड्डी सामन्यांना पाहण्यासाठी पापळसह परिसरातील गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. प्रत्येक चढाई, पकड आणि गुणांवर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळत असून, स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, दि. ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ ते १ या वेळेत या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी कबड्डीचा थरार अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार असल्याने कबड्डीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे.

ही स्पर्धा डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ, पापळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील युवकांना खेळाकडे वळवणे, त्यांच्यात शिस्त, आरोग्य व संघभावना निर्माण करणे तसेच डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“खेळातूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते,” हा संदेश या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याची भावना आयोजक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button