Latest NewsMaharashtrapolitics

राज ठाकरेंचा ‘Gen Z’ अंदाज! ‘शिवतीर्थ’मधून निघताना कारमधून केलेले हातवारे चर्चेत; नेमकं घडलं काय?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अधिकृतपणे जाहीर होणार आहे. वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असून, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती असून, या युतीच्या घोषणेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचं चित्र आहे. युतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांकडून आज पहिलं शक्तीप्रदर्शन होणार आहे.

एकाच गाडीतून हॉटेलकडे प्रस्थान

आज सकाळी पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले. काही काळ चर्चा झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच कारमधून वरळीतील हॉटेल ब्लू सीकडे रवाना झाले.

यावेळी उद्धव ठाकरे चालकाच्या मागील सीटवर बसले होते, तर त्यांच्या शेजारी राज ठाकरे होते. दोघे एकत्र गाडीत बसल्याचं पाहताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या गर्दीतून मार्ग काढताना पोलीस आणि सुरक्षारक्षकांची चांगलीच धावपळ उडाली.

राज ठाकरेंचा ‘Gen Z’ स्टाइल क्षण

हा सारा गोंधळ सुरू असतानाच एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ‘शिवतीर्थ’च्या गेटजवळून गाडी पुढे जात असताना, एका कार्यकर्त्याने आपल्या लहान मुलीला कडेवर घेत गाडीच्या जवळ येत राज ठाकरेंना अभिवादन केलं. त्या चिमुकलीने गाडीच्या खिडकीवर हात मारत राज ठाकरेंना ‘हाय’ केलं.

यावर राज ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. चिमुकलीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता, राज ठाकरेंनी हस्तांदोलन न करता जनरेशन झेड पद्धतीने दोन्ही हातांनी ‘हार्ट शेप’ बनवत तिला प्रतिसाद दिला. राज ठाकरेंचा हा अनोखा अंदाज उपस्थितांच्या लक्षात आला असून, तो क्षण सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

पत्रकार परिषदेत काय बोलणार?

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राज आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करणार असल्याची माहिती आहे. या परिषदेत नेमकी काय घोषणा होणार, जागावाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार का, तसेच काँग्रेसने मुंबईत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाकरे बंधू काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button