आमडी उड्डाणपुलावर भीषण अपघातअज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील आमडी उड्डाणपुलावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाने एका अनोळखी व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
पहाटे घडलेल्या या अपघातात धडक एवढी गंभीर होती की मृत व्यक्तीचा देह विद्रूप झाला असून ओळख पटविणे अधिक कठीण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे; मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही.
अकस्मात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझाचे कर्मचारी आणि रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे पाठविण्यात आला आहे.
अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, रामटेक पोलीस महामार्ग आणि उड्डाणपुलावरील CCTV फुटेज तपासत आहेत. वाहन आणि चालकाचा माग काढण्यासाठी पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू आहे.



