अचलपूर – आठ वर्षांनंतरची निवडणूक रंगणार! पुन्हा महिला नगराध्यक्ष पद आरक्षित; 2016 सारखेच राजकीय समीकरण

अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जवळपास आठ वर्षांच्या विलंबानंतर होणाऱ्या या निवडणुकीत यंदाही नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे 2016 प्रमाणेच पूर्वीचे राजकीय समीकरण पुन्हा तयार होताना दिसत असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
2016 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित होते. त्या वेळी काँग्रेसच्या सरवत अंजुम आणि शिवसेनेच्या सुनिता फिस्के यांच्यात चुरशीची लढत झाली होती. शेवटी सुनिता फिस्के यांनी 643 मतांच्या आघाडीसह विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले होते. फिस्के यांना 22,047 मते, तर सरवत अंजुम यांना 21,404 मते प्राप्त झाली होती.
इतर उमेदवारांचे निकाल असे –
- भाजपा : निलिमा ढेपे – 9,995 मते
- प्रहार : दीपाली जवंजाळ – 4,420 मते
- राष्ट्रवादी : दीपा नंदवंशी – 1,284 मते
- निर्दलीय : स्वाती उभाड – 1,753 मते
- वंदना लोहिया – 556 मते
तेव्हा नगरपालिकेच्या 19 प्रभागांतून एकूण 39 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये 10 निर्दलीय, 7 भाजप, 7 काँग्रेस, 8 प्रहार, 3 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, रिपाई 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 नगरसेवक होता.
आगामी निवडणुकीत एकूण 99,669 मतदार असून यामध्ये 50,031 पुरुष, 49,623 महिला आणि 10 इतर मतदारांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष पद पुन्हा महिलांसाठी राखीव झाल्याने मागील निवडणुकीप्रमाणेच राजकीय टक्कर आणि समीकरणे पुन्हा तयार होण्याची शक्यता वाढली आहे.



