मुला–मुली समानतेचा संदेश! महादेवराव माहुरे यांच्या कन्या श्रद्धाची घोड्यावरून वधू मिरवणूक चर्चेत

कामरगावात सोमवारी एक अनोखा, उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. ग्रामपंचायतचे माजी सदस्य महादेवरावजी माहुरे यांच्या एकुलत्या एक कन्या श्रद्धा माहुरे हिची पारंपरिक ढोल–ताशांच्या गजरात आणि सजवलेल्या घोड्यावरून निघालेली वधू मिरवणूक संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली.
माहुरे कुटुंबाने मुलगी–मुलगा समानतेचा संदेश देत समाजासमोर एक आगळे–वेगळे उदाहरण ठेवले आहे.
विवाह 25 नोव्हेंबरला
श्रद्धा माहुरे हिचा विवाह 25 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकरी भवन येथे होणार असून त्यापूर्वी सोमवारी सायंकाळी माता नगरी कॉलनी आणि परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सजवलेल्या घोड्यावर बसून श्रद्धाने गावाचा फेरफटका घेतला. त्या क्षणी तिच्या आनंदाला पारावर नव्हता. घोडा विशेष सजवण्यात आला होता आणि मालकाच्या आदेशानुसार शिस्तबद्ध पद्धतीने चालत होता.
वातावरण उत्साहात
संपूर्ण परिसरात लाईट सजावट, वाजतगाजत ढोल–ताशा आणि डीजेच्या तालावर नाचणारे पाहुणे यांच्या उपस्थितीने गाव उत्साहात न्हाऊन निघाले.
“भेदभाव नाही, समानतेचा मान”
वडील महादेवराव माहुरे आणि आई रेखा माहुरे यांनी सांगितले—
“मुलगी घोड्यावर बसण्याची इच्छा होती… आणि ती पूर्ण करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटला. मुलगा–मुलगी असा भेद आम्ही पाळत नाही.”
ही मिरवणूक आणि तिच्यामागचा संदेश सध्या गावासह परिसरात सर्वत्र चर्चेत असून समाजात सकारात्मक उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.



