अमरावती : शिवनगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. शिवनगाव भागात रविवारी मध्यरात्री अंदाजे 12 वाजताच्या सुमारास जमिनीने हलका डोल घेतल्याची भावना नागरिकांना झाली. शनिवारी रात्रीही अशाच धक्क्यांचा अनुभव आल्याने सलग दुसऱ्या दिवशी भूकंप जाणवताच ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली.
धक्के जाणवताच अनेक कुटुंबे झोपेतून बाहेर पडली आणि सुरक्षित स्थळी थांबली. महिलांमध्ये आणि मुलांमध्ये विशेष भीतीचे वातावरण होते. अनेक नागरिकांनी परिस्थिती शांत होईपर्यंत घराबाहेरच थांबण्याचा निर्णय घेतला.
शिवनगाव व शिरजगाव परिसरात यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी अशाच सौम्य भूकंपाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या भागाला भूकंपीय दृष्टीने संवेदनशील मानले जात असल्याची चर्चाही स्थानिकांत सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, महसूल अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी शिवनगावात धाव घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या धक्क्यांची तीव्रता आणि त्याचे मूळ केंद्र काय होते, याबाबत भूगर्भ विभागाकडून तपास सुरू आहे.



