अमरावती │ अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; दोन वरिष्ठ कर्मचारी निलंबित

अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचारी राजेश मोहन यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मनपा प्रशासनाने तत्काळ कारवाई करत विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष केंद्रे आणि लक्ष्मण पावडे या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर मृत कर्मचाऱ्याला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण अग्निशमन विभागात खळबळ उडाली असून सहकाऱ्यांनीही संबंधित कर्मचाऱ्यावर कामाच्या ठिकाणी सतत तणाव आणि छळ केल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि मनपा प्रशासन करीत आहे.
या घटनेमुळे कर्मचारी संरक्षण, कामाचा ताण आणि वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांशी कसे वागावे याविषयी मनपावर कठोर धोरणात्मक पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



