रावेर तालुक्यात पित्यानेच मुलाचा खून; कौटुंबिक वादातून घडला थरारक प्रकार

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे कौटुंबिक वादातून एका पित्यानेच आपल्या ३२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारंवार होणाऱ्या भांडणांना कंटाळून वडिलांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलाचे हातपाय बांधून मोगरीने वार
मृताचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय ३२) असून त्याचा खून त्याचेच वडील रवींद्र भगवान पाटील (वय ५६) यांनी केला. १८ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. दारूच्या नशेत घरातील शेती व वाटणीसाठी सतत भांडणे करणाऱ्या सचिनवर रवींद्र पाटील यांनी संतापाच्या भरात कठोर कारवाई केली. त्यांनी सचिनचे हातपाय दोरीने घट्ट बांधून धुणे धुण्याच्या लाकडी मोगरीने त्याच्या डोक्यावर वार केले. मुलाचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी त्यांनी आणखी काही वार केले.
पित्यानेच पोलिसांना दिली माहिती
घटनेनंतर रवींद्र पाटील यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिस पाटील रईस जाफर तडवी यांच्याशी संपर्क साधून मुलाचा खून केल्याची कबुली दिली आणि घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले.
पोलिसांचा तातडीने तपास सुरू
माहिती मिळताच फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल, तसेच पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.
पार्श्वभूमी
पोलिस सूत्रानुसार, मृत सचिनवर गुजरातमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. तो वर्षभरापासून वडील आणि सावत्र आईसोबत राहत होता. वडिलांनी उदरनिर्वाहासाठी त्याला ऑटोरिक्षाही घेतली होती; मात्र शेतीतील वाटणीवरून वडील–मुलामधील वाद सतत सुरूच होते. या सततच्या तणावाचा शेवट अखेरीस या हत्येत झाला.



