बिहार निवडणूक 2025 मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. सकाळपासूनच मतदार केंद्रांवर मोठ्या रांगा दिसत होत्या. राज्यातील 121 मतदारसंघांतील 3.75 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात एकूण 1314 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत जनसुराज पक्षाचाही पहिल्यांदाच प्रवेश झाला आहे. प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून चालवलेल्या जनसंपर्क मोहिमेनंतर थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे स्पर्धा अधिकच रंजक बनली आहे. 2020 मध्ये याच टप्प्यातील मतांवरून सरकारचे समीकरण जवळपास ठरले होते. यावेळीही हा टप्पा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वरून ट्विट करत बिहारमधील उत्साही मतदानाचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा उत्साह एनडीएला प्रचंड बहुमत देणारा संकेत आहे. त्यांनी आज अररिया आणि भागलपूर येथे जाहीर सभांनाही संबोधित केले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मतदारांना आवाहन केले की, विक्रमी मतदान करून ‘जंगलराज’ परत येण्यापासून बिहारला वाचवा आणि सुशासन टिकवा. या टप्प्यात एकूण 14 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, मंगल पांडे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे भविष्य आता मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. याशिवाय, राजदचे तेजस्वी यादव यांच्याही भविष्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लोकगायिका मैथिली ठाकुर, अभिनेता खेसारी लाल यादव, माजी आयपीएस आनंद मिश्रा आणि शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसाम शहाब हेही चर्चेत असलेले उमेदवार आहेत. आता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निकालांपर्यंतची प्रतीक्षा सुरू झाली आहे. मतदानाची टक्केवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, परंतु प्रारंभीच मतदारांची उत्साहपूर्ण उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या पहिल्या टप्प्याचे निकालच पुढील टप्प्यांच्या राजकीय वातावरणाचा सूर निश्चित करतील.



