अज्ञात व्यक्तीने सोयाबीनचा ढीग पेटवले, ७ एकर शेत राख
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे घोटाळा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. व्यंकटी कोदळे हे शेतकरी भाडेपट्ट्याने घेतलेल्या सात एकर जमिनीत सोयाबीनची शेती करत होते. कष्टाने पिकवलेले सोयाबीन काढून त्यांनी शेतातच ढीग करून ठेवले होते. मात्र, रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने तो ढीग पेटवून दिल्याने संपूर्ण माल जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यंकटी कोदळे यांचे कुटुंब या शेतीवरच अवलंबून असून, आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि शेजारी शेतकरी घटनास्थळी धावले.
मात्र आग इतकी भीषण होती की कोणीच काही करू शकले नाही. दरम्यान, या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेतकरी कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून, गावकऱ्यांनी आणि समाजाने या संकटग्रस्त कुटुंबाला त्वरित मदत करावी, अशी मागणी होत आहे.



