संभाजीनगर येथे शेतकरीची आत्महत्या, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मे महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने राज्यात धुव्वादार बॅटिंग केली. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढवलं. हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांनी गमावलं. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारला साकडे घातले. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापाई अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात घडली आहे.
नामदेव लालसिंग राठोड यांनी अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज आणि लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदतही नाही, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी डोक्यावर आल्याने लेकराबाळांसह घरच्यांना कपडे आणि इतर साहित्य कसे खरेदी करावे, या विवंचनेत घरासमोर विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेने तुपेवाडी तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच नामदेव यांच्या कुटुंबियातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अशा घटनेनंतर तरी सरकारला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.



