नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा “आरक्षण बचाव मोर्चा

नांदेड – नांदेड शहर आदिवासी समाजाच्या घोषणांनी दणाणून गेलं. “आरक्षण बचाव मोर्चा” च्या निमित्ताने हजारो आदिवासी बांधव एकत्र आले. हा मोर्चा नवा मोंढा भागातून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे समाज प्रतिनिधींनी निवेदन सादर केलं. आदिवासी समाजाने ST (अनुसूचित जमाती) प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी केली. यासोबतच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 17 संवर्गातील सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की, त्यांच्या हक्काच्या आरक्षणात हस्तक्षेप झाल्यास त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीवर परिणाम होईल. मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून, जिल्हा प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आलं आहे. समाजाने शासनाला इशारा दिला आहे की, जर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाईल.



