१२ वर्षांपूर्वी ठराव झाला… तरीही धावडा शाळेच्या वैकासाकडे दुर्लक्ष

भोकरदन – भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात दोन अत्यंत जीर्ण, तडे गेलेल्या आणि छत कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या वर्गखोल्या उभ्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक यांनी दोन महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या खोल्या तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटून गेले तरी अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या वर्गखोल्यांमध्ये कधीही मोठा अपघात होऊ शकतो, आणि विद्यार्थी किंवा शिक्षक यांना जीव गमवावा लागू शकतो, अशी भीती पालक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत, विशेष म्हणजे, या वर्गखोल्या पाडण्याचा ठराव जालना जिल्हा परिषदेने तब्बल १२ वर्षांपूर्वीच दि. ३० नोव्हेंबर २०११ (ठराव क्र. ३४४) आणि १७ जुलै २०१२ (ठराव क्र. ३००) रोजी मंजूर केला होता. पण आजपर्यंत त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही.
नागरिक आणि पालक वर्गाचा सवाल आहे, “विद्यार्थ्यांच्या डोक्यावर धोका लोंबत असताना, ग्रामपंचायत प्रशासन अजून काय वाट पाहत आहे? एखादी दुर्घटना झाल्यानंतरच कारवाई होणार का?” शाळेतील शिक्षण सुरक्षित वातावरणात व्हावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जुन्या ठरावांची अंमलबजावणी करून या वर्गखोल्या तातडीने पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



