दृश्यम आणि क्राइम पेट्रोलचा सुळसुळीत परिणाम; मुलाने वडिलांच्या हत्येचा रचला कट!

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये दृश्यम चित्रपट आणि क्राइम पेट्रोल पाहून जन्मदात्या पित्याची संपत्तीसाठी हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने सगळ्यात आधी वडिलांचा गळा दाबला त्यानंतर मित्राच्या मदतीने वडिलांचा मृतदेह औरेया येथे नेला. तसंच, ओळख लपवण्यासाठी पेट्रोल टाकून चेहरा जाळला. त्यानंतर वडिलांचा मोबाईल मित्राच्या मदतीने बिहारला पाठवून सुरू केला. त्यामुळं त्यांचं शेवटचे लोकेशन बिहारला असल्याचे दाखवले. तीन महिन्यानंतर जेव्हा आरोपीची आई वृंदावनहून आली तेव्हा तिने पती फरार असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे मुलाची चौकशी केली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला आहे.
कल्याणपूर येथील कमलापती तिवारी हे रेल्वे कर्मचारी होते. कमालपती दोन वर्षांपूर्वी बिहारच्या मधुबनी जिल्ह्याच्या जयनगरयेथून गार्ड या पदावर निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी मधु तिवारी जास्तीत जास्त वृंदावन येथे राहत होती. त्यांचा लहान मुलगा रामजी बेरोजगार होता. रामजी नारामऊ येथील सासरी राहत होता. मधु तिवारीने मुलगा रामजीसोबत फोनवरुन बोलली तेव्हा त्याने सांगितले की वडील जयनगर येथे गेले आहेत.
मधु तिवारी जेव्हा 29 मे रोजी वृंदावनहून परतली तेव्हा रामजीने म्हटलं की, 15 मार्च रोजी वडील जयनगर येथे गेले. तेव्हापासून त्यांचा फोन बंद आहे. त्यानंतर पत्नीने 12 जून रोजी कल्याणपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कमलापतीच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन गेल्या चार एप्रिल रोजी जयनगर येथे सापडले होते. तिथे पोलिसांशी संपर्क केला तेव्हा तिथे त्यांचा कुठेच पत्ता सापडला नाही. दोन दिवसांपूर्वी औरेयाच्या बेला पोलिसांना 18 मार्च रोजी एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आला होता. मात्र फोटो पाहूनच पत्नीने ओळखला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी त्याच्या सासरी राहत होता. वडिल बेपत्ता झाल्यानंतर तो त्यांच्या घरात राहायला लागला होता. पोलिसांनी जेव्हा रामजीची चौकशी केली तेव्हा त्यांना संशय आला. पोलिसांनी जेव्हा रामजीची अधिक चौकशी केली तेव्हा यासगळ्या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मित्र ऋषभला ताब्यात घेतले. डीसीपी पश्चिम यांच्यामते, रामजीने 17 मार्च रोजी त्यांची हत्या केली. रामजीचे वडिल त्यांना पैसे देत नव्हते. पैसे मागितल्यानंतर पत्नीसमोरच पाणउतारा करायचे. यामुळंच रागाच्या भरात त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे.
दृश्यम चित्रपटात ज्या प्रमाणे हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे योजना रामजीने बनवली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो अनेकदा क्राइम पेट्रोलदेखील पाहत होता. त्यानंतर हत्येनंतर वडिलांच्या हत्येनंतर त्यांचे कपडे जाळून फेकून दिले. त्यानंतर ओळख मिटवण्यासाठी पॉलीथिन आणि पेट्रोल टाकून चेहरा जाळून टाकला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.



