६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ रुपयांचं आमिष दाखवत १० आणि १३ वर्षांची मुलं या मुलीला घेऊन गेले. अज्ञातस्थळी नेऊन आरोपींनी त्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलगी घरी रडत आल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. १० आणि १३ वर्षीय अल्पवयीन मुलांनी सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. दोन्ही आरोपी मुलं पीडित मुलीच्या शेजारीच राहतात. त्यांनी पीडितेला ५ रुपयांचे आमिष दाखवत एका घरामध्ये घेऊन गेले. त्याठिकाणी आरोपींनी पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी रडत रडत घरी आली. आई-वडिलांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेली घटना सांगितली. ते ऐकून तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.
पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं. दोघांची चौकशी केली जात आहे. पीडित मुलीवर सध्या काशीराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तपासणी देखील करण्यात आल्या. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून प्रचंड रक्तस्राव होत आहे.
पीडित मुलीला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर सुरूवातीला उपचार करण्यात हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून कागदपत्र आणा असे डॉक्टर सांगत राहिले. कागदपत्र दिल्यानंतरच पीडितेवर उपचार सुरू करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांचे वय १५ वर्षांच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. आता त्यांची रवानगी आता बालसुधारगृहामध्ये करण्यात येणार आहे.



