BeedLatest NewsMaharashtra

बीडमध्ये पत्नीने पतीवर लाथाबुक्क्यांनी हल्ला; गंभीर जखमेने पतीचा मृत्यू

बीड : बीडमधील अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात पती कैलास सरवदे (वय 37, रहिवासी क्रांतीनगर, अंबाजोगाई) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कैलासच्या पत्नी माया सरवदे हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (कलम 105) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलासचे सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत, तर कैलासकडून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास शरीराने अपंग होता आणि त्याला दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. माया त्याला उपाशी ठेवत असे, तर दारूचे सेवन करताना कैलासने वाद वाढवला.

घटना १० सप्टेंबर, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास क्रांतीनगर भागात घडली. कैलास दारू पिऊन घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या मायाने कैलासला खाली पाडून त्याच्या पोटावर आणि अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी आणि शेजार्‍यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, पण माया म्हणाली, “आमच्यामध्ये पडू नका, हा रोज दारू पिऊन असाच करतो, मी याला फुकट सांभाळायचं का?” आणि सर्वांना शिवीगाळ केली.

जखमी अवस्थेत कैलासला रिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी उपचार सुरू होण्यापूर्वी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यूचे कारण दारूच्या अतिसेवनामुळे समजले, पण शवविच्छेदन अहवालानुसार कैलासचा मृत्यू मारहाणीत झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला आहे.

या घटनेमुळे अंबाजोगाई परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पीएसआय रविकुमार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माया सरवदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button