Latest NewsMaharashtra

‘लालबागचा राजा’ विसर्जनावरून वाद पेटला! स्थानिक कोळी विरुद्ध मंडळ; आता थेट न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वोच्च मान असलेल्या ‘लालबागचा राजा’ च्या विसर्जनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक कोळी समाजातील हिरालाल वाडकर यांनी केलेल्या आरोपांवर मंडळाने कडाडून विरोध दर्शवला असून, आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात थेट अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे.

नेमकं काय घडलं?

‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली. ही मिरवणूक 22 तासांच्या प्रवासानंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचली. यानंतर गुजरातहून आणलेला स्वयंचलित तराफा वापरून मूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तराफ्याची उंची अधिक असल्याने भरतीच्या लाटांमध्ये मूर्ती चढवणे शक्य झाले नाही. परिणामी, 33 तासांनी उशिरा विसर्जन पार पडले.

सोशल मीडियावर टीका आणि वाद

मूर्ती चौपाटीवर बराच वेळ अडकून राहिल्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून मंडळाच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. या टीकेचा आधार स्थानिक कोळी आणि नाखवा हिरालाल वाडकर यांनी दिलेल्या निवेदनांवर असल्याचे स्पष्ट झाले.

वाडकरांचे आरोप काय?

हिरालाल वाडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “यंदा विसर्जनाची जबाबदारी आम्हा कोळी बांधवांकडून न घेता गुजरातच्या तराफ्याला दिली गेली आणि त्यामुळे गणित चुकले.” त्यांनी असेही नमूद केले की, “आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत.”

मंडळाची तीव्र प्रतिक्रिया

मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी स्पष्ट केले की:

“हिरालाल वाडकर यांचा आमच्या मंडळाशी कधीही कोणताही संबंध नव्हता. त्यांनी कधीही ‘लालबागचा राजा’चे विसर्जन केलेले नाही. केवळ प्रसिद्धीसाठी आणि बदनामीसाठी त्यांनी खोटी माहिती पसरवली.”

मंडळाने या “खोट्या आरोपांमुळे सार्वजनिक प्रतिमा मलीन झाल्याचा” दावा करत मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दावा 10 सप्टेंबर 2025 रोजी दाखल केला जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button