भरधाव डंपरची भीषण धडक; तरुणाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ भीषण अपघात घडला. भरधाव डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
गजानन पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने गजानन याला धडक दिली. या धडकेत तो रस्त्यावर फेकला गेला आणि डंपर त्याच्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह चौफुलीवर आणून रस्त्यावर ठेवल्याने वाहतूक ठप्प झाली. दोन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. अखेर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला.
दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिस व ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला वावदडा परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूक आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



