अकोल्यात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अपघात : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी | महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप

अकोला : अकोला शहरातील जुना शहर संकुलातील सोनटाके प्लॉट येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात कामावरून घरी परतणाऱ्या दोन तरुणांना वीज प्रवाहाचा धक्का बसून, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव सय्यद राजा असून, अस्लम नावाचा दुसरा तरुण सध्या खाजगी रुग्णालयात उपचाराधीन आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
निष्काळजी महावितरणवर नागरिकांचा रोष
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे. पावसात उघड्या पडलेल्या वीज वाहिन्यांचा धोका वारंवार निदर्शनास येत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनास्थळावर मोठा जमाव जमा झाला होता आणि प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.
आमदार घटनास्थळी; पीडित कुटुंबाला दिलासा
या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमीच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि मृताच्या कुटुंबीयांना धीर दिला.
“या प्रकरणी संबंधित विभागावर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन आमदार पठाण यांनी दिले.
सततच्या पावसात वाढलेला धोका
सध्या अकोला शहरात सतत पावसाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत उघड्या वायरिंग, विजेचे पोल, वीज वाहिन्यांची देखभाल न होणे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



