राज्यात २० लाख एकरवर पिकांचे नुकसान; अतिवृष्टीने शेतकऱ्यांपुढे संकटकृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती; नांदेड आणि वाशिम जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

वाशिम : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमधील तब्बल २०,१२,७७५ एकर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग, उडीद यासारख्या प्रमुख पिकांचा समावेश आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, ८०५,११० हेक्टर (अंदाजे २०.१२ लाख एकर) क्षेत्र प्रभावित झाले आहे.
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे कोणते?
जिल्हा नुकसानग्रस्त क्षेत्र (हे.) अंदाजे एकर
नांदेड २,८५,५४३ ७,१३,८५७ एकर
वाशिम १,६४,५५७ ४,११,३९२ एकर
यवतमाळ ८०,९६९ २,००,०००+ एकर
बुलढाणा ७४,४०५ १,८०,०००+ एकर
अकोला ४३,७०३ १,०८,०००+ एकर
सोलापूर ४१,४७२ १,०२,०००+ एकर
हिंगोली ४०,००० ९८,८४०+ एकर
वाशिम जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
पंचनामे सुरू, मदतीचे आश्वासन
राज्यातील सर्व नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, अहवाल प्राप्त होताच तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे भरणे यांनी सांगितले. त्यांनी यावेळी असेही स्पष्ट केले की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” आणि केंद्र सरकारशीही पाठपुरावा केला जाईल.
खरीप हंगामावर गंभीर परिणाम
यंदाच्या अतिवृष्टीने खरीप हंगामात उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सर्वात जास्त नुकसान सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि उडीद या पिकांचे झाले असल्याची नोंद आहे



