तिवसा तालुक्यात ढगफुटी, खासदार बळवंत वानखडे यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेती, घरं आणि मालमत्तेची मोठी हानी झाली. या पार्श्वभूमीवर, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिवसा, शेंदुरजना बाजार, अंनकवाडी, डेहनी, निंभोरा, रघुनाथपूर, माळधूर, भांबोरा, वरखेड, तारखेड, झापडापूर, वाठोडा शेतशिवर आणि मोझरी या गावांना ढगफुटीसदृश्य पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि गावातील घरांचं, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी स्वतः गावकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी, त्यांनी तहसीलदारांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले. तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश साबळे, तिवसा शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव वानखेडे आणि योगेश वानखेडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.



