‘उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राला दारूडा बनवण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा…’; फडणवीसांवरील टीकेला आक्रमक उत्तर

BJP Slams Uddhav Thackeray: फडणवीसांचे सरकार महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खूश करण्यासाठी? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलेला.
BJP Slams Uddhav Thackeray: राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना ‘महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा डाव’ असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्री बंदीवरुन टीका करताना, “सुरतमधून शिंदे यांचे आमदार गुवाहाटी येथे पोहोचले व 55-60 रेडे, बकऱ्या, कोंबड्यांचे बळी दिले. त्या बळी प्रथेची परंपरा अशी की, बळी दिलेल्या प्राण्याचे मांस शिजवून प्रसाद म्हणून भक्षण करावे लागते. त्यामुळे रेड्याचे मांस पचवून आमदार मुंबईस आले. फडणवीसांचे सरकार मांसाहारातून निर्माण झाले. तेच आता स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खूश करण्यासाठी?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. याच टिकेला आता भाजपाने जशास तसं उत्तर दिलं आहे.
…हा तर निव्वळ ढोंगीपणा
“उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याची कॉपी महाराष्ट्रात करून महाराष्ट्राला दारुडे बनवण्याचा डाव रचणाऱ्यांनी आता शाकाहार, मांसाहार, नैवेद्य यावर बोट ठेवून उपदेशाचे चाटण लावणे हा तर निव्वळ ढोंगीपणा,” असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ‘सामना’च्या वेबसाईटवरील संजय राऊतांच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत हे विधान केलं आहे.
त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच
“मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाही पण उध्दव ठाकरेंनी हा महाराष्ट्र दारूडा करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच,” असा टोला भाजपाने लगावला आहे. “देवाला मांस अर्पण करण्यापेक्षा माणसाच्या जीवनात सात्विकता, संयम आणि नैतिकता आणणे हेच खरे धर्मकारण आहे. म्हणूनच संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
उध्दव ठाकरे- संजय राऊत जोडीचा दुटप्पीपणा
“गरीबांचे आयुष्य आणि संसार देशोधडीला लावणारी दारु विक्री वाढवण्यासाठी सत्तेवर असताना वेगवेगळी शक्कल लढवायची आणि सत्ता गमावली की संस्कृतीचा कांगावा करायचा… हा उध्दव ठाकरे- संजय राऊत जोडीचा दुटप्पीपणा महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही,” असा उल्लेखही उपाध्ये यांच्या पोस्टमध्ये आहे.
भ्रष्टाचार करण्याची संधी
“दारु विक्रीचे धोरण आखून त्यात भ्रष्टाचार करण्याची संधी असते हे महाविकास आघाडीने वेळोवेळी दाखवून दिले आहे. राज्याला दारूडे बनविण्याएैवजी शाकाहारातून आरोग्य, सात्विकता आणि शुद्ध समाज निर्माण करणे कधीही उत्तम,” असं म्हणत शाकाहाराचं समर्थन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राची संत परंपरा मांसाहाराला चालना देत नाही
“महाराष्ट्राची संत परंपरा मांसाहाराला चालना देत नाही, आणि व्यसनाधीनतेलाही थारा नाही, तेव्हा महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता स्वतः आरशात पाहण्याची वेळ आली आहे. आणि हो… धूळ आरशावर नाही, चेहऱ्यावर आहे,” असा टोला पोस्टच्या शेवटी केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

राऊतांनी फडणवीस सरकारच्या स्थापनेसंदर्भात कोणता आरोप केला आहे?
राऊत यांनी दावा केला की, फडणवीसांचे सरकार मांसाहारातून निर्माण झाले आहे. त्यांनी म्हटले की, शिवसेना फोडण्यासाठी अमित शहा यांनी सुरत आणि गुवाहाटी येथे आमदारांसाठी दारू-मटणाच्या पार्ट्या आयोजित केल्या, जिथे 55-60 रेडे, बकरे आणि कोंबड्यांचे बळी देऊन त्यांचे मांस प्रसाद म्हणून खाल्ले गेले. त्यामुळे मांसाहारातून सरकार बनवणारे आता स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालत आहेत, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
भाजपाने राऊत यांच्या टीकेला कसे प्रत्युत्तर दिले आहे?
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांच्या टीकेला ‘निव्वळ ढोंगीपणा’ संबोधत त्यांच्यावर पलटवार केला. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ‘सामना’मधील राऊत यांच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दारूडे बनवण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्राची ओळख चांगली आहे.
भाजपाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर कोणता आरोप केला आहे?
उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, सत्तेत असताना ठाकरे यांनी दारू विक्री वाढवण्यासाठी धोरणे आखली आणि भ्रष्टाचार केला, आणि आता सत्ता गमावल्यानंतर संस्कृतीचा कांगावा करत आहेत. तसेच, महाविकास आघाडीने दारू विक्रीच्या धोरणातून भ्रष्टाचाराची संधी शोधल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाने शाकाहाराचे समर्थन कसे केले आहे?
केशव उपाध्ये यांनी म्हटले की, मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा माणसाच्या जीवनात सात्विकता, संयम आणि नैतिकता आणणे हेच खरे धर्मकारण आहे. त्यांनी संत सावता माळी यांचा उल्लेख करत “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असा दाखला दिला. तसेच, शाकाहारातून आरोग्य, सात्विकता आणि शुद्ध समाज निर्माण होईल, असे ते म्हणाले.



