AkolaLatest News

“अकोला-दर्यापूर महामार्गावरील बसस्थानकांची तोडफोड: ‘ओपन बार’चा आरोप, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी”

अकोला : नुकताच तयार झालेला राज्य महामार्ग क्रमांक ३१२ हा अकोला ते दर्यापूर मार्ग वाहतूक सुलभतेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या महामार्गालगत उभारण्यात आलेल्या छोट्या बसस्थानकांवर काही तळीरामांनी दारूच्या नशेत तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सदर घटनेत बसस्थानकांवरील बैठकीच्या खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली असून, शासनाच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दारू पिण्याच्या वादातून जिल्ह्यात याआधी दोन ते तीन खूनही झाले आहेत.

“ऑपरेशन प्रहार” सुरू असलं तरी…
दारूबंदी व अवैध विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी अकोला पोलीस विभागाकडून ‘ऑपरेशन प्रहार’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. यात अनेक ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर कारवाईही झाली आहे. मात्र, राज्य महामार्गावरील घटनांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.

“अकोला ओपन बार?” – नागरिकांचा संतप्त सवाल
दिवसा असो वा रात्री, महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गैरवर्तन आणि तोडफोड हे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काहीजण तर “अकोला ओपन बार झालंय का?” असा थेट सवाल उपस्थित करत आहेत.

नागरिकांची मागणी: पोलीस गस्त वाढवा!
या घटनांमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांचे आणि महिलांचे सुरक्षिततेचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा तळीरामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button