पातूरमध्ये बोगस सोयाबीन बियाणे वाटप? शेतकऱ्यांचा संताप, चौकशीची मागणी

अकोला : पातूर तालुक्यातील आलेगाव गावातील शेतकरी निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाविरोधात बोगस बियाण्यांच्या वितरणाची गंभीर तक्रार दाखल केली आहे. २०२५ च्या खरीप हंगामासाठी ऑनलाईन सोडतीद्वारे मिळालेले बियाणे पूर्णतः निकृष्ट, बुरशीग्रस्त आणि अंकुरणक्षमतेविना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कापकर यांच्या निवेदनानुसार, त्यांच्या वडिलांना (तोताराम नामदेव कापकर) मिळालेली बियाण्यांची पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्या बियाण्यांची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे लक्षात आले. ही बाब केवळ एकट्या कापकर यांच्यापुरती मर्यादित नसून, पातूर तालुक्यातील अनेक शेतकरी अशाच समस्येला सामोरे जात आहेत.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“बोगस बियाणे वाटप करणाऱ्यांविरोधात बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ नुसार फौजदारी कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी कापकर यांनी केली आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया
तहसीलदार डॉ. राहल वानखडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून,
“कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावित चौकशीसंदर्भात सूचना दिल्या आहेत,” असे ते म्हणाले.
- शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या –
- बियाण्याची प्रयोगशाळेमार्फत वैज्ञानिक तपासणी करून तातडीचा अहवाल प्रसिद्ध करावा
- दोषी एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी
- शेतकऱ्यांना नुकसानभरपाई – बियाण्याची किंमत, पेरणी खर्च व मजुरीसह भरपाई मिळावी
- भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात
आंदोलनाचा इशारा
“जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तालुक्यातील शेतकरी संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडतील,” असा इशारा निलेश कापकर यांनी दिला आहे.



