यशोदा नगर चौकात वाहतूक गोंधळ! अपघाताचा धोका वाढला
अमरावती : अमरावती शहरातील यशोदा नगर चौक सध्या प्रचंड वाहतूक गोंधळाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शुक्रवारी सकाळपासून या ठिकाणी दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची अनिर्बंध गर्दी पाहायला मिळाली. या गोंधळात भर टाकली ती म्हणजे कामाच्या शोधात जमलेल्या शेकडो बांधकाम मजुरांनी. परिणामी, या संपूर्ण भागात गोंधळाचे आणि अपघाताचे वातावरण निर्माण झाले.
वाहतूक पोलीस गायब, नागरिक त्रस्त
शुक्रवारी सकाळी संपूर्ण चौकात एकही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हता. परिणामी वाहनचालकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागला. यावेळी अनेकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चौक पार केला.
वाहतूक व्यवस्थेचा भंग
यशोदा नगर चौक हा बडनेरा जुना बायपास, मोतीनगर, महादेव खोरी, आणि चपराशीपुरा यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा चौक आहे. येथे दररोज प्रचंड वाहतूक असते. शुक्रवारी मात्र ही वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती.
बांधकाम मजुरांची गर्दी, अपघाताची शक्यता
चौकात सकाळपासूनच कामाच्या शोधात शेकडो बांधकाम कामगार जमले होते. वाहनांची गर्दी आणि पायदळ मजुरांची घसघशीत संख्या यामुळे कोणताही वाहनचालक कंट्रोल गमावला असता, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
प्रशासनाला जाग येणार कधी?
स्थानिक नागरिकांनी विचारले आहे की, “सकाळी वाहतूक पोलीस कुठे होते?”
अनेकांचा दावा आहे की, हे प्रशासनाचे पुन्हा एकदा दिसलेले ढिसाळपणाचे उदाहरण आहे. मोठा अपघात टळला असला तरी धोका अजूनही कायम आहे. नागरिकांची मागणी आहे की, यशोदा नगर चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलीस तातडीने तैनात करावेत.



