हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याने अमरावती मनपा आयुक्तांना अवमान नोटीस

रहाटगाव येथील जुन्या स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश; पुढील सुनावणी ७ जानेवारी २०२७ रोजी
अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी अमरावती महानगरपालिका आयुक्तांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने आयुक्तांना अवमान नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्ते चंद्रशेखर गोविंदगीर गिरी यांनी यापूर्वी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर आदेश प्राप्त झाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले होते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर निर्णय घेतला. मात्र, महानगरपालिका आयुक्तांकडून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अॅड. विशाल आनंद यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
या प्रकरणी १३ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनावणी झाली होती. आवश्यक सूचना घेण्याची संधी मिळूनही आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर आयुक्तांना अवमान याचिका आणि संलग्न कागदपत्रांसह नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, रहाटगाव येथील जुन्या स्मशानभूमीच्या आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.



