ओटीए कामठीत भव्य पासिंग आऊट परेड; ३९६ एनसीसी अधिकारी झाले पासआऊट

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी स्वीकारली परेडची सलामी; युवकांना योग्य दिशा देत राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याचे आवाहन
नागपूर : कामठी येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) येथे भव्य आणि दिमाखदार पासिंग आऊट परेड पार पडली. ९० दिवसांच्या कठोर प्रशिक्षणानंतर एनसीसी सिनिअर डिव्हिजनचे एकूण ३९६ केअरटेकर ऑफिसर्स (सीटीओ) प्रशिक्षण पूर्ण करून पासआऊट झाले. भारत सरकारचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी या शानदार परेडची सलामी स्वीकारली.
या प्रसंगी एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वारिंदर वत्स, वायएसएम, एसएम, व्हीएसएम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ओआरसीएन एसडी-१७५ या अभ्यासक्रमांतर्गत देशातील १९ एनसीसी संचालनालयांमधील ३६८ आर्मी आणि २८ नेव्हल केअरटेकर ऑफिसर्सनी परेडमध्ये सहभाग घेतला. मद्रास रेजिमेंटल ग्रुप, बेंगळुरू सेंटरच्या मिलिटरी बँडच्या जोशपूर्ण धूनांवर अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर केला.
यावेळी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना एनसीसीची उद्दिष्टे आणि आदर्श सदैव जपण्याचे आवाहन केले. युवकांना योग्य दिशा देऊन तसेच कॅडेट्सना जबाबदार आणि ऊर्जावान नागरिक बनवून हे अधिकारी राष्ट्रनिर्माणात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या ड्रिलचे संरक्षण सचिवांनी कौतुक केले. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षण संचालनासाठी ओटीएच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या परेडमधून एनसीसीचे एकता आणि अनुशासन हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात साकार झाले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सर्व ३९६ केअरटेकर ऑफिसर्सना एनसीसी कमिशन प्रदान करण्यात आले. त्यामुळे ते आता असोसिएट एनसीसी ऑफिसर्स म्हणून कार्यरत होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याशिवाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग ऑफ एनसीसी अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयातील डिप्लोमाही प्रदान करण्यात आला.



