Accident NewscitynewsGondia

पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू! गोंदियात संतप्त नातेवाईकांचा आक्रोश

दांडेगाव बसस्थानकाजवळ गोंदिया-तिरोडा महामार्गावर भीषण अपघात; पोलीस चालकावर गुन्हा दाखल करण्यासह आर्थिक मदत आणि शासकीय नोकरीची मागणी

गोंदिया : सिटी न्यूज प्रतिनिधी – सुधीर शिवणकर

गोंदिया जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला भीषण धडक बसून तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदिया तालुक्यातील दांडेगाव बसस्थानकाजवळ गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातात खळबंदा येथील रितेश बावनकर (वय १७), शिवप्रसाद कांबळे (वय १७) आणि सेजगाव येथील कार्तिक बिसेन (वय २०) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांचे वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तिघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर गावकरी आणि नातेवाईक आक्रमक

घटनेची माहिती मिळताच मृत तरुणांचे नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. अपघाताला जबाबदार असलेल्या पोलीस वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता गंगाझरी पोलीस ठाण्यासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलीस अधीक्षक आणि आमदारांकडून नातेवाईकांची भेट

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात पोलीस अधीक्षक गौरव भामरे आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मात्र, नातेवाईकांनी केवळ आश्वासनावर समाधान न मानता संबंधित पोलीस वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.

जोपर्यंत प्रशासनाकडून या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

प्रशासनाच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

तीन तरुणांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा आक्रोश आणि पोलिसांच्या वाहनाच्या अपघातातील भूमिकेबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे गोंदिया जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई होते आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button