
मेहकर तालुक्यात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा; दररोज १,५०० पेक्षा अधिकची गरज, मात्र केवळ ७०० स्टॅम्प पेपर उपलब्ध
मेहकर | बुलढाणा
एकीकडे दुष्काळाचे संकट, दुसरीकडे डोक्यावर असलेले कर्ज आणि त्यातच कृषी कर्जाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा… अशा दुहेरी संकटात मेहकर तालुक्यातील शेतकरी सापडले आहेत. कृषी कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक असल्याने शेतकरी सकाळपासून मेहकर तहसील कार्यालय परिसरात रांगा लावत आहेत. मात्र दिवसभर प्रतीक्षा करूनही अनेक शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपर मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे.
सध्या कृषी कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बँकांकडून कर्ज प्रक्रियेसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी केली जात असल्याने त्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मेहकर तालुक्यात दररोज १,५०० पेक्षा अधिक स्टॅम्प पेपरची आवश्यकता असताना सब ट्रेझरी कार्यालयाकडून केवळ ७०० स्टॅम्प पेपर उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे दररोज सुमारे ७०० ते ८०० शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपर न मिळाल्याने परतावे लागत आहे.
विशेष म्हणजे, स्टॅम्प पेपर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तहसील कार्यालय परिसरात थांबावे लागत आहे. शेतीची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून शेतकरी तासनतास रांगेत उभे राहत आहेत. मात्र एवढा वेळ घालवूनही स्टॅम्प पेपर मिळण्याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे कर्ज नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अशा अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
आठवड्याला केवळ तीन हजार स्टॅम्प पेपरचा पुरवठा
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या तुटवड्याबाबत सब ट्रेझरी अधिकारी श्रीकृष्ण कोलते यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मेहकर तालुक्याला आठवड्याला जवळपास सात हजार स्टॅम्प पेपरची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात ट्रेझरी कार्यालयाला आठवड्याला केवळ तीन हजार स्टॅम्प पेपर मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
याबाबत घाटबोरी येथील शेतकरी राजेश नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे अंगावर असलेले कर्ज फेडण्यासाठी आणि शेतीचा आर्थिक गाडा पुढे नेण्यासाठी कृषी कर्जाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर अनिवार्य असताना तोच उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून तहसील कार्यालयात दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करून स्टॅम्प पेपरचा पुरेसा पुरवठा करावा. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी मागणी त्यांनी केली.
कृषी कर्ज नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा कर्ज प्रक्रियेला विलंब होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सिटी न्यूजसाठी गजानन राऊत, बुलढाणा.



