Accident NewscitynewsJalnaMaharashtra

मोकाट वळूच्या हल्ल्यात ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

जालना शहरातील मस्तगड परिसरात भररस्त्यात धुमाकूळ; तीन दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर

जालना : शहरातील मस्तगड परिसरात मोकाट वळूने भररस्त्यात धुमाकूळ घालत केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप रतीलाल राठोड असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मस्तगड परिसरातील रहिवासी होते. तीन दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जालना शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मस्तगड परिसरात मोकाट वळू आक्रमक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वळूला पिटाळून लावण्यासाठी परिसरातील नागरिकांनी दगड आणि काठ्यांचा आधार घेतला. मात्र, तरीही हा वळू मागे हटण्यास तयार नव्हता. याचदरम्यान वळूने दिलीप राठोड यांच्यावर जोरदार हल्ला केला. वळूच्या शिंगांचा त्यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने ते जागीच जखमी झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू करत त्यांच्या छातीत नळी टाकून साचलेले रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. सीटी स्कॅन, एक्स-रे आणि एमआरआय तपासण्यांमध्ये त्यांच्या छातीच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचे तसेच छातीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले.

जालन्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गंभीर दुखापती आणि वाढते वय यामुळे त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही. अखेर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांच्या विनंतीनुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एका ज्येष्ठ नागरिकाचा मोकाट वळूच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मोकाट जनावरांमुळे अपघात आणि हल्ल्यांच्या घटना घडत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आणखी किती नागरिकांना अशा घटनांचा बळी ठरल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button