
सलमान शेख यांच्या कुटुंबाला अवघ्या सात दिवसांत दिलासा; पत्नीला नोकरी, दोन्ही मुलींना दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन
नागपूर : भांडेवाडी येथील कचरा प्रक्रिया व बायो-मायनिंग कंपनीत काम करताना अपघातात मृत्यू झालेल्या कामगार सलमान शेख यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळवून देण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने आणि वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगाराच्या कुटुंबीयांना एकूण २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यास सहमती दर्शविली. विशेष म्हणजे, घटनेनंतर अवघ्या सात दिवसांत हा प्रश्न मार्गी लागल्याने शेख कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

भांडेवाडी येथील कचरा प्रक्रिया व बायो-मायनिंग कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सलमान शेख यांचा कामादरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाचा आधार हरपल्याने त्यांच्या पत्नी, आई-वडील आणि दोन मुलींसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब समोर येताच शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख नितीन तिवारी यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवसैनिक आणि कामगारांसह कंपनी परिसरात आंदोलन करून मृत कामगाराच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी नितीन तिवारी यांनी युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार प्यारे खान यांच्या मध्यस्थीने कंपनी व्यवस्थापन, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन तिवारी आणि मृत कामगाराच्या कुटुंबीयांची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चेअंती कंपनी व्यवस्थापनाने २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यानुसार १० लाख रुपये मृत कामगाराच्या पत्नीला, तर उर्वरित १० लाख रुपये त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आले. ही रक्कम शिवसेनेच्या वतीने कुटुंबीयांना वितरित करण्यात आली.
नुकसानभरपाईसोबत कुटुंबाच्या भविष्याचीही काळजी
केवळ आर्थिक नुकसानभरपाईवरच न थांबता मृत कामगाराच्या कुटुंबाच्या भविष्यासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सलमान शेख यांच्या पत्नीला त्यांच्या इच्छेनुसार कंपनीत नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या नोकरी करीत असेपर्यंत सलमान शेख यांना मिळणाऱ्या वेतनाइतकी रक्कम पेन्शनच्या स्वरूपात देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या दोन्ही मुलींना संबंधित योजनेअंतर्गत दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मृत कामगाराची ईएसआयसी आणि पीएफची पात्र थकीत रक्कम मिळवून देण्यासाठीही शिवसेना प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नितीन तिवारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे एका गरीब कुटुंबाला अवघ्या सात दिवसांत २० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देणे शक्य झाल्याचे सांगितले. या सहकार्याबद्दल त्यांनी दोन्ही नेत्यांचे तसेच मध्यस्थीची भूमिका बजावणारे प्यारे खान यांचे विशेष आभार मानले.
या वेळी मुन्ना तिवारी, आशीष हाडगे, अब्बास अली, ललित बावनकर, मुकेश सुरिवंशी, उमेश वर्मा, प्रफुल्ल वैद्य यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
— नितीन तिवारी, जिल्हाप्रमुख, शिवसेना नागपूर



