AmravatiAmravati Policscitynewslatestnewss breakingnews

अमरावतीत नवजात बालकांच्या कथित तस्करी प्रकरणाला नवे वळण; १२ वर्षांत सहा बालकांचे हस्तांतरण केल्याची डॉ. भोजने यांची कबुली!

सहा नवजात बालकांना वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांकडे दिल्याची माहिती; साडेतीन लाखांच्या कथित सौद्याच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; भोजने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत २० नोव्हेंबरपर्यंत वाढ

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील नवजात बालकांच्या कथित तस्करी प्रकरणात तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत असून, या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. तब्बल १२ वर्षांच्या कालावधीत सहा नवजात बालकांना वेगवेगळ्या व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांकडे दिल्याची कबुली डॉ. वैशाली भोजने यांनी पोलीस कोठडीदरम्यान दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. २०१४ ते २०२६ या कालावधीत ही बालके त्यांच्या पालकांच्या संमतीने दिल्याचा दावा डॉ. भोजने यांनी केल्याचे समजते. मात्र, या बालकांच्या हस्तांतरणामागील नेमके कारण, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता का आणि या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

डॉ. वैशाली भोजने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेल्या बालकांना योग्य कुटुंब मिळावे, या उद्देशाने आपण त्यांना अन्य व्यक्ती किंवा संस्थांकडे दिले होते. संबंधित बालकांच्या पालकांची संमती होती, असा त्यांचा दावा आहे. तसेच, या प्रक्रियेत कोणताही आर्थिक व्यवहार झाला असेल, तर त्याच्याशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. मात्र, ही सहा बालके नेमकी कोणाकडे सोपविण्यात आली, कोणत्या संस्थांचा त्यात सहभाग होता आणि सध्या ती बालके कुठे आहेत, याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.

साडेतीन लाखांच्या कथित सौद्याची ऑडिओ क्लिप तपासणीसाठी

या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा साडेतीन लाख रुपयांत सौदा ठरल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमधील आवाज डॉ. वैशाली भोजने यांचाच असल्याचा दावा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला होता. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक प्रयोगशाळेशी पत्रव्यवहार केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत डॉ. वैशाली भोजने यांच्या आवाजाचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आवाजाच्या नमुन्यांच्या तपासणीनंतर व्हायरल क्लिपमधील संभाषणाबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

जयस्वाल नामक व्यक्तीचा शोध सुरू

या प्रकरणाच्या तपासात जयस्वाल नावाच्या व्यक्तीची भूमिका देखील पोलिसांकडून तपासली जात आहे. सहा नवजात बालकांच्या हस्तांतरणामध्ये या व्यक्तीचा काही संबंध होता का, कथित आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पोहोचतात का, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर झाली. १८ ऑक्टोबर रोजी भोजने दाम्पत्यासह पीडितेवर अत्याचार करून तिला मातृत्व लादल्याचा आरोप असलेल्या साडेसोळा वर्षीय विधिसंघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर भोजने दाम्पत्य बुटी प्लॉट परिसरातील भोजने मॅटरनिटी होमला कुलूप लावून पसार झाल्याची माहिती तपासात समोर आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी दाम्पत्याने पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी कार आणि दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत. तसेच, दोघांच्या हस्ताक्षरांचे नमुनेही तपासासाठी घेण्यात आले आहेत. प्रफुल्ल भोजने तपासात सहकार्य करत असल्याची माहिती असली, तरी डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

२० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढ

या प्रकरणातील तपासाची व्याप्ती लक्षात घेता तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात ठोस युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने भोजने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत २० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. या वाढीव कोठडीत सहा बालकांच्या हस्तांतरणाची माहिती, संभाव्य आर्थिक व्यवहार, व्हायरल ऑडिओ क्लिप आणि जयस्वाल नामक व्यक्तीची भूमिका याबाबत अधिक तपास केला जाणार आहे.

एकीकडे सहा नवजात बालकांच्या हस्तांतरणाची कबुली समोर येत असताना, दुसरीकडे साडेतीन लाखांच्या कथित सौद्याच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणामागे नेमके काय घडले, बालकांच्या हस्तांतरणामध्ये कोणाचा सहभाग होता आणि कथित आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील पुढील खुलाशांकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button