citynewsCrime NewsMaharashtraNanded

रील बनविण्याच्या नादात तीन एकर ऊस जळून खाक; नांदेडमध्ये शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट राख

सोशल मीडियावरील रीलसाठी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याचा आरोप; श्यामराव शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान, दिवाळीपूर्वीच कुटुंबावर संकट

नांदेड : सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात काही तरुणांच्या निष्काळजीपणाचा फटका एका शेतकरी कुटुंबाला बसल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. शहरालगतच्या बायपास रोड परिसरात लागलेल्या आगीत मरळ येथील शेतकरी श्यामराव ज्ञानुजी शिंदे यांच्या तब्बल तीन एकर उसाचे पीक जळून खाक झाले. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत राख झाल्याने शिंदे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच या शेतकरी कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरालगतच्या बायपास रोड परिसरात काही तरुण सोशल मीडियासाठी रील बनविण्यासाठी गेले होते. यावेळी फटाके फोडण्यात आल्याने त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे शेतातील उसाच्या पिकाला आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण तीन एकरांवरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शेताला आग लागल्याची माहिती शेतकरी श्यामराव शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच ते मरळ गावातून सुमारे तीन किलोमीटर अंतर धावत शेताकडे पोहोचले. मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण उसाच्या पिकाला वेढा घातला होता. डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत जळून खाक होताना पाहून शिंदे यांना मोठा धक्का बसला. आधीच दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि वाढत्या महागाईमुळे अडचणीत असलेल्या या कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकप्रतिनिधींकडून मदतीचे आश्वासन

घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी नंदू पाटील निळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या उसाच्या पिकाची पाहणी केली. तसेच पीडित शेतकरी कुटुंबाला धीर दिला. नरेंद्र दादा चव्हाण यांनीही मदतीसाठी पुढाकार घेत जळालेला ऊस तातडीने तोडण्यासाठी तोडणी पथक पाठविण्याचे आश्वासन दिले. याशिवाय शेतकरी कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

‘सरकारने मदत केली तरच आमच्या घरात दिवाळी साजरी होईल’

या घटनेनंतर व्यथित झालेल्या शेतकरी श्यामराव ज्ञानुजी शिंदे यांनी आपली व्यथा मांडली. आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि महागाईमुळे आम्ही अडचणीत होतो. त्यात दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचे सर्वस्व हिरावले गेले. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. शासनाकडून मदत मिळाली तरच आमच्या घरात दिवाळी साजरी होईल, अन्यथा आमच्या अंगणात अंधारच राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रीलच्या नादात दुसऱ्यांच्या जीविकेशी खेळ कधी थांबणार?

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच शेतशिवारात बेजबाबदारपणे फटाके फोडणे आणि रील तयार करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. काही क्षणांच्या मनोरंजनासाठी केलेल्या निष्काळजीपणाची किंमत एका शेतकऱ्याला वर्षभराच्या मेहनतीने मोजावी लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आग लागण्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. आता पोलीस आणि महसूल प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button