नाशिकच्या सातपूरमध्ये शाळेला भीषण आग; शालेय साहित्य जळून खाक

फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर मिळवले नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी टळली
नाशिक : नाशिक शहरातील सातपूर परिसरात शनिवारी मध्यरात्री एका शाळेच्या आवारात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शाळेतील उपयुक्त साहित्य आणि शालेय वस्तू जळून खाक झाल्या. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाळा क्रमांक २६ (मराठी), ३० (हिंदी) आणि ३१ (उर्दू) या शाळांच्या परिसरात शनिवारी मध्यरात्री अचानक आग भडकली. सुरुवातीला आगीचे स्वरूप मर्यादित असले तरी काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीनिमित्त फटाके फोडताना उडालेल्या ठिणगीमुळे शाळेच्या आवारातील साहित्याने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन बंबांनाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत शाळेतील उपयुक्त साहित्य तसेच शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने आणि घटना मध्यरात्री घडल्याने शाळेत विद्यार्थी, शिक्षक किंवा अन्य कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, शाळेच्या परिसरात आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सातपूर पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सुरू आहे. फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



