AmravaticitynewsCrime Newslatestnewss breakingnews

अमरावती-पुणे प्रवासासाठी चार हजारांचे भाडे! खासगी ट्रॅव्हल्सकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट?

दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत मनमानी भाडेवाढीचा आरोप; नितीन मोहोड यांचे वेलकम पॉइंटवर आंदोलन, आरटीओकडून कुंदन ट्रॅव्हल्सला मेमो

अमरावती : दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अमरावती ते पुणे या प्रवासासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल चार हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मनमानी भाडेवाढीविरोधात नितीन मोहोड यांनी अमरावतीच्या वेलकम पॉइंटवर आंदोलन केले. विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) पथक घटनास्थळी दाखल झाले आणि खासगी प्रवासी बसची तपासणी सुरू केली.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक पुण्याकडे प्रवास करतात. याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून नियमित भाड्यापेक्षा दुप्पट भाडे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमरावती ते पुणे प्रवासासाठी काही विद्यार्थ्यांकडून दोन हजार रुपये, तर काहींकडून तब्बल चार हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सुरू असलेल्या या भाडेवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर नितीन मोहोड यांनी वेलकम पॉइंट येथे आंदोलन उभारून खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला. आंदोलनाची माहिती मिळताच आरटीओ विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. यावेळी कुंदन ट्रॅव्हल्सच्या बसमधील विद्यार्थ्यांच्या तिकिटांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित ट्रॅव्हल्सला आरटीओकडून मेमो देण्यात आला.

आरटीओकडून ६०० वाहनांची तपासणी; भाडेवाढीच्या ३५ प्रकरणांवर कारवाई

आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे ६०० वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त लगेजच्या ८० प्रकरणांमध्ये, तर अवाजवी भाडेवाढीच्या ३५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नियमबाह्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

केवळ मेमो देऊन प्रवाशांची लूट थांबणार का?

दरम्यान, आरटीओच्या कारवाईवर नितीन मोहोड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सला केवळ मेमो देऊन प्रश्न सुटणार नाही. नियम मोडणाऱ्या बस जप्त करा, आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण आकडा सार्वजनिक करा आणि प्रवाशांची होणारी आर्थिक लूट कायमस्वरूपी थांबवा, अशी मागणी त्यांनी केली. आगामी ख्रिसमस, नववर्ष आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळातही खासगी ट्रॅव्हल्सकडून अशाच प्रकारे मनमानी भाडेवाढ होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. मात्र, केवळ तपासणी आणि मेमो देण्यापुरतीच कारवाई मर्यादित राहणार की नियमभंग करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर कठोर पावले उचलली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दिवाळीच्या काळात विद्यार्थ्यांच्या खिशाला बसणारी कात्री थांबविण्यासाठी आरटीओ प्रशासन कोणती कायमस्वरूपी भूमिका घेते, याकडे अमरावतीकरांसह पुण्याकडे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button