AmravatiAmravati Gramincitynewslatestnewss breakingnews

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बच्चू कडू यांचे व्यापक अभियान; गावोगावी राबविणार लाभार्थी नोंदणी मोहीम!

शिवसेना-प्रहारचा पुढाकार; शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा व एकल महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर, कार्यकर्त्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन

चांदूर बाजार (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना-प्रहारच्या वतीने अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

रविवार, १५ नोव्हेंबर रोजी कुरळ पूर्णा येथील शिवसेना-प्रहार कार्यालयात बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सहाही जिल्हा परिषद सर्कलमधील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावागावांत जाऊन दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व्यक्ती, विधवा तसेच एकल महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना दिले. केवळ लाभार्थ्यांची नोंदणी करून थांबायचे नाही, तर संबंधित पात्र व्यक्तींना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पशुपालक, दूध उत्पादक आणि महिला बचत गटांसाठी विशेष नियोजन

बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या चारा लागवड योजनेसह पशुपालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने चारा लागवड आणि पशुधन संवर्धनाच्या योजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.

तसेच भूजल आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी, जलतारा उपक्रम, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्याबाबतही चर्चा झाली. दूध उत्पादक शेतकरी तसेच महिला बचत गटांना शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.

कार्यकर्त्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

सामाजिक आणि संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना कार्यकर्त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याच्या उद्देशाने बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या कामासोबतच कार्यकर्त्यांचे आरोग्य जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

‘समस्या तुमची, मदत आमची’ या भूमिकेतून गावोगावी अभियान

‘समस्या तुमची, मदत आमची’ या भूमिकेतून शिवसेना-प्रहारचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन गरजू नागरिकांची नोंदणी करतील. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

या बैठकीला सुधाकरराव भारसाकळे, बल्लू जवंजाळ, मंगेश देशमुख, प्रदीप बंड, दीपक भोरे, निलेश जाधव, संजय तट्टे, रहमानभाई, हाजी सोहेल, सचिन खुळे यांच्यासह शिवसेना व प्रहारचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button