सोयाबीनच्या सुडीला आग; शेतकऱ्याला २ लाख ४५ हजारांचा फटका!

जानेफळ शिवारातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ शिवारात शेतात कापणी करून सुडीच्या स्वरूपात ठेवलेल्या सोयाबीनला आग लागल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या आगीत शेतकरी शेख लालमिया यांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे २ लाख ४५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख लालमिया (वय ३६, रा. जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांची जानेफळ शिवारातील गट क्रमांक २७३ मध्ये शेती आहे. या शेतातील कापणी करून सुडीच्या स्वरूपात ठेवलेल्या सोयाबीनला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आगीमुळे सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यासमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे.

या घटनेप्रकरणी शेख लालमिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(फ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आगीचे नेमके कारण काय, तसेच ही आग कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावली, याचा तपास पोलीस करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मेहनतीने पिकवलेले सोयाबीन आगीत जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.



