AmravaticitynewsFestival News

अंबादेवी नवरात्रोत्सवात व्यावसायिकांसाठी १४९ स्टॉलची संधी

राजकमल चौक ते गांधी चौक मार्गावर ५×७ फुटांचे तात्पुरते प्लॉट; महापालिकेकडून कोटेशन मागविले

अमरावती प्रतिनिधी : अंबादेवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने व्यावसायिकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावर नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तात्पुरते व्यवसायिक स्टॉल उभारण्यासाठी एकूण १४९ खुले प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व्यावसायिकांकडून जास्तीत जास्त दराचे कोटेशन मागविण्यात आले आहे.

अंबादेवी नवरात्रोत्सवाच्या काळात अमरावती शहरात भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी होत असते. या कालावधीत विविध वस्तूंची विक्री तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना अधिकृत स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावर मंजूर नकाशानुसार रस्त्याच्या दुतर्फा स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी ५×७ फूट आकाराचे, म्हणजेच ३५ चौरस फूट क्षेत्रफळाचे एकूण १४९ खुले प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित जागा केवळ व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार आहे.

या प्लॉटसाठी महानगरपालिकेने १० हजार ५४१ रुपये शासकीय दर, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि त्यापेक्षा अधिक दराची ऑफर असलेले कोटेशन मागविले आहे. इच्छुक व्यावसायिकांनी नियमानुसार कोटेशन सादर करून या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.

कोटेशनच्या अटी व शर्ती बाजार व परवाना विभागाच्या राजापेठ येथील, हॉटेल ग्रेस इनच्या मागील झोन क्रमांक २, पहिला मजला येथील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, दुकान किंवा आस्थापना भाड्याने देताना दरवर्षीच्या भाडे शुल्कामध्ये १० टक्के नैसर्गिक वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यावर नियमानुसार जीएसटी लागू राहणार आहे. त्यामुळे कोटेशन सादर करताना संबंधित व्यावसायिकांनी या बाबींची नोंद घेणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोटेशन फॉर्मसोबत पुढील वर्षाची आरक्षित पावतीची छायाप्रत, परवाना अनुज्ञप्तीची छायाप्रत तसेच लागू असल्यास जीएसटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय कोटेशनची रक्कमही महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पद्धतीने जमा करावी लागणार आहे.

कोटेशन फॉर्म व अटी-शर्तींसाठी ५०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी अशी रक्कम भरावी लागणार आहे. अर्ज सादर करण्याची मुदत ६ ऑक्टोबर २०२६ ते ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

त्यानंतर सिलबंद कोटेशन ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अतिरिक्त आयुक्त-२, बाजार व परवाना विभाग, राजापेठ, हॉटेल ग्रेस इनच्या मागील झोन कार्यालयात दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेली कोटेशन ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अतिरिक्त आयुक्त-२ यांच्या कार्यालयात उपस्थितांसमोर उघडण्यात येणार आहेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे कोटेशन स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने इच्छुक व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत कोटेशन सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button