कोरंबी टोला रस्त्यावर भीषण अपघात

कारचा टायर फुटला अन् नियंत्रण सुटले; आजोबा-नातीनला धडक, उपचारादरम्यान आजोबांचा मृत्यू
गोंदिया | मोरगाव अर्जुनी : कोरंबी टोला परिसरात आज दुपारी भीषण अपघात झाला. वडसाकडून मोरगाव अर्जुनीच्या दिशेने जाणाऱ्या होंडाई i20 कारचा (MH 04 JB 8857) अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
या स्कुटीवर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साधू ऋषी नाकाडे (वय 72) आणि त्यांची नात प्रेरणा भास्कर नाकाडे (वय 18) असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही अर्जुनीकडून कोरंबी टोला गावाच्या दिशेने जात होते.
अपघातात आजोबा-नात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी साधू ऋषी नाकाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेरणा नाकाडे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
हा अपघात वासुदेव शेंडे यांच्या शेताजवळ घडला. कार चालकाचे नाव कुणाल सुकारे, रा. विशोरा असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मोरगाव अर्जुनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा नेमका कारण आणि परिस्थितीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सिटी न्यूजसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.



