
ऐतिहासिक चौकाची दुर्दशा; स्वच्छतागृहाचा अभाव, असामाजिक तत्त्वांचा वावर आणि स्मारकाच्या विटंबनेचा आरोप
अमरावती : शहराच्या ऐतिहासिक वेलकम पॉईंटची सध्या अक्षरशः दुर्दशा झाली असून, स्वागत चौकातच घाणीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. खासगी बसेसचा थांबा असल्याने दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी साधी स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. त्यातच असामाजिक तत्त्वांचा वाढता वावर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या समस्यांची तातडीने दखल घेऊन परिसराची स्वच्छता आणि सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी अमरावतीकर नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मंडळाने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमरावतीच्या अंबा माता मंदिर परिसरातील हा ऐतिहासिक वेलकम पॉईंट सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अमरावती दौऱ्यावेळी या चौकात भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणाला वेलकम पॉईंट अशी ओळख मिळाली.
आज याच परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष येथे मॉर्निंग वॉक तसेच योगासाठी येतात. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचीही या परिसरात मोठी वर्दळ असते.
मात्र, एवढी वर्दळ असतानाही प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, पावसाळ्यात यामुळे साप आणि विंचूंचा धोका निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सायंकाळनंतर परिसरात दारू पिणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण आणि असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा न्यायाधीशांची शासकीय निवासस्थाने या परिसराच्या जवळच आहेत. असे असतानाही वेलकम पॉईंटची अशी अवस्था का झाली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, परिसरात नियमित पोलीस गस्त सुरू करावी, तसेच महानगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून सफाई कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऐतिहासिक वारसा आणि शहराची ओळख असलेल्या वेलकम पॉईंटची ही अवस्था प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता नागरिकांच्या निवेदनाची मुख्यमंत्री आणि प्रशासन किती गांभीर्याने दखल घेतात आणि वेलकम पॉईंटला पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित रूप कधी मिळते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.



