बोरडा शिवारात शेतकऱ्याच्या शेतातून 1 लाख 33 हजारांचे शेती साहित्य लंपास!

ट्रॅक्टरची ट्रॉली, दातार, रोटाव्हेटरसह तीन जोडी कॅजवेल चोरीला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू
रामटेक तालुक्यातील बोरडा शिवारात शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 1 लाख 33 हजार रुपयांचे शेती साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली, दातार, रोटाव्हेटर आणि तीन जोडी कॅजवेल असा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त साहित्याचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरडा शिवारात 26 ऑगस्ट रोजी शेती साहित्य चोरीची घटना उघडकीस आली.
बोरडा येथील शेतकरी विलास शामराव चौधरी, वय 40 वर्षे, यांची सर्वे क्रमांक 531 मध्ये शेती आहे.
शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर आणि विविध शेती अवजारे ते शेतात ठेवत होते.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला आणि ट्रॅक्टरची ट्रॉली, दातार, रोटाव्हेटर तसेच तीन जोडी कॅजवेल असा एकूण 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सकाळी शेतात गेल्यानंतर शेती साहित्य गायब असल्याचे विलास चौधरी यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी तातडीने रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
ही चोरी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यामध्ये दातार आणि कॅजवेल नेण्यात आले असावे, तर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर नेण्यात आला असावा, अशी चर्चा आहे.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी खुमारी परिसर तसेच ग्रामपंचायत बोरडा येथील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.
शेतातील महागडी शेती अवजारे चोरीला गेल्याने बोरडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
शेतातील शेती साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
बोरडा शिवारातील या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या महागड्या शेती साहित्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असून, या तपासातून चोरीचा छडा कधी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक.



