BreakingNewscitynewsDhamangaon

कौटुंबिक वादातून बीएसएनएल टॉवरवर चढला व्यक्ती; सात तासांनी सुखरूप खाली

पत्नी, सासू आणि मेव्हण्याचे प्रयत्न अपयशी; बहिणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोविंद गवई खाली उतरले

धामणगाव रेल्वे शहरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने थेट बीएसएनएलच्या टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास गोविंद गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कुटुंबीयांच्या संयमी प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ४२ वर्षीय गोविंद गवई हे अमर शहीद भगतसिंग चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढले. कौटुंबिक वादातून सुमारे सहा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खावटीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी ते न्यायालयात आले होते. यावेळी मेव्हण्यासोबत वाद झाल्यानंतर संतप्त होऊन त्यांनी टॉवरवर चढल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांसह कुटुंबीयांनीही फोनवरून आणि प्रत्यक्ष घटनास्थळी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

पत्नी, सासू आणि मेव्हण्यानेही गोविंद गवई यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र ते खाली उतरण्यास तयार नव्हते.

अखेर बहिणीने फोनवरून भावाशी संवाद साधत त्यांची समजूत काढली. बहिणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोविंद गवई रात्री साडेअकराच्या सुमारास सुखरूप खाली उतरले.

यानंतर पोलिसांनी त्यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे पाठवले.

पोलिस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कुटुंबीयांच्या संयमी प्रयत्नांमुळे अखेर मोठा अनर्थ टळला.

तब्बल सात तास चाललेल्या या थरारक घटनाक्रमाचा शेवट अखेर सुखरूप झाला. कुटुंबीयांच्या समजूतदारपणामुळे आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे गोविंद गवई यांना सुरक्षित खाली उतरवण्यात यश आले.

सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button