धामणगाव रेल्वेत भव्य कावड यात्रा; हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

बोल बमच्या जयघोषाने परिसर दुमदुमला; ढोल-ताशांचा गजर, आकर्षक जिवंत देखावे आणि सामाजिक एकतेचा संदेश
धामणगाव रेल्वे परिसर आज भक्तिरसात न्हाऊन निघाला! भगवान भोलेनाथांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, तर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीने पवित्र कावड यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झालं. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ठेका आणि आकर्षक जिवंत देखावे हे यात्रेचं विशेष आकर्षण ठरलं. जटाधारी कावड यात्रा समिती सिनियर यांच्या आयोजनातून निघालेल्या या यात्रेत भक्तीबरोबरच सामाजिक एकतेचंही दर्शन घडलं.
बोल बम आणि हर हर महादेवच्या जयघोषात धामणगाव रेल्वे परिसर भक्तिमय झाला होता. जटाधारी कावड यात्रा समिती सिनियर यांच्या आयोजनातून पवित्र कावड यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली.
हजारो शिवभक्त या यात्रेत सहभागी झाले आणि भगवान महादेवाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला.
ऐतिहासिक कौंडण्यपूर येथून या कावड यात्रेला सुरुवात झाली. वरदा नदीच्या पात्रातून विधिवत मंत्रोच्चार करत पवित्र जल कावडमध्ये भरण्यात आलं.
त्यानंतर अंजनशिंगी, ढाकुलगाव, अशोक नगर, गुंजी आणि जुना धामणगाव मार्गे ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं.
शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या यात्रेदरम्यान नागरिक आणि विविध मंडळांकडून शिवभक्तांसाठी अल्पोपहार आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ठेका आणि आकर्षक जिवंत देखाव्यांमुळे यात्रेचा उत्साह आणखी वाढला. श्री श्याम बाबा आणि श्री बजरंग बली यांचे आकर्षक देखावे विशेष आकर्षण ठरले.
या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किन्नर समुदायानेही श्रद्धाभावाने सहभाग घेतला. त्यांच्या सहभागातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
यानंतर कावड यात्रा जुना धामणगाव येथील पुरातन दत्तापूर शिव मंदिरात पोहोचली. कावडमध्ये आणलेल्या पवित्र जलाने शिवपिंडीचा जलाभिषेक करण्यात आला. जलाभिषेकानंतर विधिवत आरती करण्यात आली आणि त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं.
हजारो शिवभक्तांच्या सहभागामुळे संपूर्ण धामणगाव परिसर शिवमय झाला होता. भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम या कावड यात्रेत पाहायला मिळाला.
दरम्यान, यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भक्तीचा जल्लोष, हर हर महादेवचा जयघोष आणि हजारो शिवभक्तांचा उत्साह यामुळे धामणगाव रेल्वेतील ही कावड यात्रा अविस्मरणीय ठरली. भक्तिभावासोबतच सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.



